बुटीबोरी : नागपूर-बुटीबोरी मार्गावरील बोथली फाटा येथे एमडीच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १७ व १८ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आली. ४७.६२ ग्रॅम एमडी व तीन मोबाइल, असा एकूण दोन लाख ६८ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक गस्तीवर असताना बोथली फाटा येथे एक व्यक्ती एमडी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. फिरोज इब्राहिम खान (३५, रा. बुटीबोरी), मोहसिन अब्दुल बेरा (३९, रा. बुटीबोरी), एहफज उर्फ लक्की अहमद खान (२६, रा. खरबी, नंदनवनजवळ, नागपूर) व फारुख मुलताज शेख (२५, रा. खरबी, नागपूर), अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत दोन लाख ३८ हजार १०० रुपये किमतीचा ४७.६२ ग्रॅम एमडी व ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चनोर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे व इतरांनी केली.





