PMAY 2.0 अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमाला बळ; पात्र लाभार्थ्यांना मिळाला दिलासा
बुटीबोरी, जि. नागपूर : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (सर्वांसाठी घरे) अंतर्गत नगर परिषद बुटीबोरीच्या वतीने मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या कार्यक्रमाला नगर परिषद बुटीबोरीचे नगराध्यक्ष श्री. सुमित शंकरराव मेंढे, उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती श्री. आकाश म. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी श्री. भुपेंद्र येवले यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला चालना मिळत आहे. या योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्राप्त झाल्याने पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या घरकुलाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
नगर परिषद बुटीबोरीच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.



