बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीच्या नाल्यात पांढऱ्या रंगाचे पाणी वाहताना दिसून आल्याने परिसरात या पाण्याच्या स्रोताबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच एमआयडीसी परिसरातील एका मोठ्या मैदानात मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप आणि कचरा साचल्याचा मुद्दाही समोर आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्यातील पाणी वेणा नदीमार्गे पुढील जलस्रोतांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी पाण्याची गुणवत्ता तपासून त्याचा स्रोत स्पष्ट करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, मैदानात साचलेल्या स्क्रॅप आणि कचऱ्याला आग लावली जात असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कचरा जाळल्यामुळे धूर आणि हानिकारक वायू हवेत मिसळण्याची शक्यता असते. यामुळे वायुप्रदूषण वाढून पर्यावरणावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराचीही संबंधित प्रशासनाने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी उबाठा शिवसेनेचे उपाध्यक्ष तुषार डेरकर यांनी संबंधित विभागांनी परिसराची पाहणी करून पाण्याचा स्रोत, स्क्रॅप-कचऱ्याची मालकी आणि कचरा जाळण्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी भूमिका मांडली आहे.
पाण्याची गुणवत्ता तपासणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि कचरा जाळण्यासारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





