बुटीबोरी: दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा सण असला, तरी समाजातील अनेक गरजू घटकांपर्यंत हा आनंद पोहोचत नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी बुटीबोरी येथील बालाजी कॉन्व्हेन्ट कनिष्ठ महाविद्यालयाने ‘करा दान, मिळवा समाधान’ हा अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी वापरण्यायोग्य जुने कपडे, साड्या, ब्लँकेट, चादरी, खेळणी आणि शालेय साहित्य मोठ्या प्रमाणावर दान केले.
संकलित करण्यात आलेल्या या सर्व वस्तू ५ नोव्हेंबर २०२६ रोजी व्ही.एन.आय.टी. कॉलेज, नागपूर येथील ‘प्रयास फाऊंडेशन’चे प्राध्यापक डॉ. गोपी निंबार्ते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या फाऊंडेशनच्या माध्यमातून या वस्तू दिल्ली येथील ‘गुंज’ या नामांकित सामाजिक संस्थेकडे पाठविण्यात येणार असून, तिथून त्या झोपडपट्टी भागातील गरजू मुले व कुटुंबांपर्यंत पोहोचविल्या जातील.
या उपक्रमाबाबत बोलताना संचालक प्रथमेश नेउलकर व प्राचार्य प्रवीण भोयर यांनी सांगितले की, जुन्या वस्तूंच्या पुनर्वापरामुळे सामाजिक बांधिलकी तर जपली जातेच, शिवाय गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून दान करणाऱ्यांना आत्मिक समाधान मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. बालाजी कॉन्व्हेन्टच्या या प्रेरणादायी उपक्रमाला नागरिकांकडून वर्षानुवर्षे भरभरून प्रतिसाद मिळत असून, यामुळे खऱ्या अर्थाने गरजूंच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पसरत आहे.



