बुटीबोरी : तथागत भगवान बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी पंचशीलेचा मार्ग दिला. अहिंसा, चोरी न करणे, सदाचार, सत्य बोलणे, व्यसनमुक्तीचा अवलंब करून मानवी जीवनाचे कल्याण होऊ शकते. स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे विचार भदंत प्रज्ञानंद थेरो यांनी मांडले.
संकल्प बुद्धविहार जुनी वस्ती येथे बुधवारी (४ नोव्हेंबर) वर्षावास कार्यक्रम आयोजित होता. पुढे बोलताना भदंत प्रज्ञानंद म्हणाले, कुणालाही त्रास देऊ नका. सर्वांशी प्रेमाने वागा. प्रामाणिकपणे कष्ट करा व दुसऱ्याच्या हक्काचा आदर करा. प्रत्येक स्त्री-पुरुषाचा सन्मान करा. चारित्र्य जपा. खोट्या बातम्या, अफवा आणि बदनामीपासून दूर राहा. दारू, तंबाखू व अमली पदार्थांपासून दूर राहून ज्ञानाचा मार्ग स्वीकारा. हा मार्गच मानवाला उच्चतम जीवन जगण्यासाठी मदत करू शकतो. सायंकाळी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. भोजनदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.



