बुटीबोरी (प्रतिनिधी): आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असलेल्या शुभ दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून बुटीबोरी शहरात महापुरुषांच्या विचारांना व कार्याला वंदन करत दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. (दि. ८ नोव्हेंबर) मराठा लायन्स परिवारातर्फे प्रभाग क्रमांक ४ मधील विडीओ चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्युरलचे तसेच बिरसा मुंडा चौक येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी समस्त मित्रपरिवार व मराठा लायन्स परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. महापुरुषांचे स्मरण करत व ‘जय जिजाऊ! जय शिवराय!’ आणि ‘जय बिरसा मुंडा!’ च्या जयघोषात उपस्थित सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.



