बुटीबोरी प्रतिनिधी – बालपणीच्या मासूम आनंदाला आणि पतंग उडविण्याच्या आवडीला एका १४ वर्षांच्या मुलाच्या आयुष्याचा अंत करावा लागला. बुटीबोरी परिसरात शेताच्या कुंपणात सोडलेल्या बेकायदेशीर वीज प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत बालकाची ओळख प्रिंस पद्माकर पारखी (वय १४, रा. छोटी बोरी, बुटीबोरी) अशी पटली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण छोटी बोरी गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रिंस नेहमीप्रमाणे पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळ उलटून रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. चिंतातूर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी रात्रभर त्याचा शोध घेतला, पण त्याचा काहीही सुत्ता लागला नाही. अखेर त्रस्त वडिलांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ नोंद करून त्याचा शोध सुरू केला.
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस आणि कुटुंबीय पुन्हा एकदा छोटी बोरी परिसरात त्याचा शोध घेत होते. याचदरम्यान एका शेतात मन हेलावून टाकणारे दृश्य समोर आले. जुनी वस्ती परिसरातील एका शेताभोवती जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावण्यात आले होते. या तारांमध्ये वीजप्रवाह सोडण्यात आला होता, असे सांगितले जात आहे. यादरम्यान प्रिंसचा त्या तारांशी स्पर्श झाला आणि तीव्र विजेचा झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृतदेह या कुंपणाच्या तारांवर पडलेला आढळला.
हसतखेळत असलेल्या निष्पाप बालकाच्या अशा अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी आई-वडिलांचा टाहो पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. शेताच्या कुंपणात अशा प्रकारे जीवघेणा वीजप्रवाह सोडल्याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



