कारची दुचाकीला धडक : हळदगाव टोल प्लाझाजवळील घटना
बुटीबोरी : वेगाने जाणाऱ्या कारने समोर असलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यासोबत असलेली तीन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी-वर्धा महामार्गावरील हळदगाव टोल प्लाझाजवळ रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रलय सुरेश भगत (२९, रा. सावंगी मेघे, ता. जि. वर्धा) असे मृताचे नाव असून, त्यांची पत्नी आरती भगत (२७) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या डाव्या पायाला व दोन्ही हातांना गंभीररीत्या दुखापत झाली. या घटनेत सोबत असलेली त्यांची चिमुरडी आयरा ही थोडक्यात बचावली. प्रलय भगत हे पत्नी व मुलीसह एमएच-३२/एपी-७७८१ क्रमांकाच्या दुचाकीने टाकळघाट येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते. दरम्यान, बुटीबोरी-वर्धा महामार्गावरील हळदगाव टोल प्लाझाजवळ मागून वेगाने येणाऱ्या एमएच-३४/एए-४५१४ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने प्रलय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिला व मुलीला बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या अपघातात प्रलय यांच्या मृत्यूने चिमुकलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची पत्नी आरती यांच्यावर वर्धा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.



