बुटीबोरी:बुटीबोरी ते एमआयडीसी मार्गावर मेट्रोचे बांधकाम आणि वळणासाठी अधिकृत कट (Cut) उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना करावा लागणारा जीवघेणा प्रवास अखेर संपला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला व निवेदनाला मोठे यश आले असून, प्रशासनाने या मार्गावरील बंद असलेला डिव्हायडर खुला केला आहे. त्यामुळे वाहनचालकांची ‘रॉंग साईड’ (Wrong Side) जाण्याच्या त्रासातून मोठी सुटका झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच बुटीबोरीकरांच्या वतीने एमआयडीसी मार्गावरील अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि राईट साईड जाण्यासाठी कट नसण्याच्या गंभीर समस्येबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. जिथून मेट्रोचे काम सुरू होते, तिथून अवघ्या ५० मीटर अंतरावर दोन मोठी रुग्णालये, बँका, कोचिंग क्लासेस व पुढे सीरा चौकात शाळा असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कट बंद असल्यामुळे वाहनांना विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागून अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला होता.
नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने दखल घेत डिव्हायडर खुला केल्याबद्दल बुटीबोरीकर नागरिकांनी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून अपघातांनाही मोठा आळा बसणार आहे.



