काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय शूटबॉल स्पर्धेसाठी भारकस येथील दोन खेळाडूंची निवड!
#महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टाकेश्वर धुर्वे व दिशांत जोडे नेपाळला रवाना;
प्रशिक्षक विक्रम परमार यांच्या प्रयत्नांना यश
बुटीबोरी :- ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारी अभिमानास्पद घटना घडली असून, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय फर्स्ट शूटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारकस (किरमिटी) येथील दोन खेळाडूंची नेपाळमधील काठमांडू येथे निवड झाली आहे. टाकेश्वर रोहित धुर्वे आणि दिशांत प्रवीण जोडे हे दोन्ही खेळाडू २२ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणे ही गावासाठी गौरवाची बाब ठरत असून, त्यांच्या या यशामागे प्रशिक्षक विक्रम परमार यांचे अथक परिश्रम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आई-वडील, गावातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी दिलेले सहकार्यही उल्लेखनीय आहे. गावच्या मातीतून आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंत पोहोचलेल्या या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, त्यांच्या निवडीमुळे गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


